Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीसामाजिकतेच्या उध्दारासाठी छत्रपती शिवबांच्या विचारांचा जागर व्हावा-- प्रविणदादा देशमुख , शिव व्याख्याते
spot_img

सामाजिकतेच्या उध्दारासाठी छत्रपती शिवबांच्या विचारांचा जागर व्हावा– प्रविणदादा देशमुख , शिव व्याख्याते


चामोर्शी :- सामाजिक विषमता , वैचारिक मतभेद विसरून माणसाला माणूस म्हणून समजून घेण्यासाठी महाराष्ट्रातील संतांचे विचार अतिशय मौलिक असून प्रत्येकाने या संत पुरुषांच्या विचाराचा अंगिकार करावा तसेच भारताच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर आदर्शवत जीवन व्यतीत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर केल्यास जीवनात नैराश्य कधी शिवणार नाही आणि वैयक्तिक प्रगती सोबतच सामाजिक प्रगती साधण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही त्यासाठी केवळ आणि केवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे न्यायप्रिय विचार वैश्विक ऐक्य भावाचे प्रतिक ठरू शकते . म्हणूनच विदेशात सुद्धा शिवाजी महाराजांच्या विचाराधारेवरच राष्ट्र जिवंत असल्याचे अनेकविध मौलिक उदाहरणातून प्रसिद्ध शिव व्याख्याते प्रविणदादा देशमुख यांनी सार्वजनिक शिव – भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित समाज प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रम – बाजार चौक , चामोर्शी येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी प्रतिपादन केले . संत तुकाराम , संत रोहिदास , संत सेवालाल , छत्रपती शिवाजी आणि कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते .
✳️तर उद्घाटक नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार नगरपंचायत चामोर्शी यांनी – ” सार्वजनिक शिव -भीम जयंती उत्सव समिती मागील नऊ वर्षापासून संयुक्त जयंती महोत्सवातून जातीभेद विसरून सलोखा साधण्याच्या दृष्टीने समाजप्रबोधनाचा कार्यक्रम विविध प्रसिद्ध वक्तयांच्या वैचारिक प्रबोधनातून जातीयतेची दरी कमी करून सामाजिक पातळी उंचावण्याचे कार्य सदोदित करत आहे . याचा मला सार्थ अभिमान वाटतो .
✳️कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील पोलीस स्टेशन चामोर्शी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सायबर क्राईम व विविध प्रकारचे गुन्हे याबाबत माहिती दिली आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनता किती साधी – भोळी , सरळ स्वभावाची असूनही अशा वैचारिक कार्यक्रमासाठी सढळ हाताने मदत करून सर्व जातीय संघटना यासाठी एकवटतात , एकत्र येतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात यापेक्षा दुसरे उदाहरण ते कोणते असणार ? यासाठी माझे सहकार्य सदोदित राहणार .
या कार्यक्रमाप्रसंगी घेण्यात आलेल्या समूह नृत्य / लघुनाटीका स्पर्धेत शिवाजी हायस्कूल चामोर्शीच्या स्पर्धकांनी प्रथम बक्षिस 5000 रुपये रोख , यशोधरा हायस्कूल चामोर्शी यांनी लघुनाटीका सादर करून द्वितीय बक्षिस 3000 हजार रुपये रोख तर कृषक हायस्कूल चामोर्शी यांनी तृतीय बक्षिस 2000 रुपये रोख प्राप्त केले . याशिवाय डिज्नीलँड प्रेसिडेन्सी इंग्लिश मीडियम स्कूल यांना 1ooo रुपये रोख प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले . तसेच शहरातील विविध शाळांमध्ये घेण्यात आलेल्या सामान्यज्ञान स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 रुपये रोख ,सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला . यामध्ये आर्यन रामटेके , जयश्रीकृष्ण दहेलकर , श्रुती गडे , कोमल आडे , श्रेयश वाळके , आदिती कुनघाडकर , अस्मिता बुरे ,सुहानी दूधबावरे ,दिनेश बोबाटे यांनी सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बारसागडे , प्रस्ताविक देवानंद उराडे तर आभार पुरुषोत्तम घ्यार यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चामोर्शी शहरातील सर्व पक्षीय संघटना , नगरपंचायत चामोर्शीचे पदाधिकारी व कर्मचारी आणि सार्वजनिक शिव -भीम जयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page